शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर नागापूर (थापलिंग) येथे जल्लोषात संपन्न
राष्ट्रीय सेवा योजना विभाग शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) यांचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि.२९/०१/२०२४ ते दि.०४/०२/२०२४ या कालावधीत मौजे नागापूर (थापलिंग), ता. आंबेगाव जि. पुणे येथे जल्लोषात संपन्न झाले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “युवकांचा ध्यास, ग्राम-शहर विकास” या संकल्पनेवर आयोजित या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये श्री क्षेत्र थापलिंग येथे पार पडलेल्या पंचक्रोशीत प्रसिध्द असलेल्या यात्रेनंतर गडावर झालेला कचरा काढून गड स्वच्छ करणे या कामावर मुख्यत्वे भर देण्यात आला. शिबिर कालावधीत श्रमदान सत्रामध्ये ६५ एकरावर पसरलेल्या श्री क्षेत्र थापलिंग गड व परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. तसेच गावातील स्मशानभूमी परिसरात लावलेल्या विविध वृक्षांच्या परिसराची साफसफाई करून झाडांना आळे करून पाणी देण्यात आले. याशिवाय, गावातील नागेश्वर मंदिर परिसर व मुख्य रस्त्याच्या दुतार्फाही स्वच्छता करण्यात आली.
याशिवाय, ग्रामपंचायतीमार्फत गावातील गायरान जमिनीवर अभिनव संकल्पनेद्वारे विकसित केलेल्या “नक्षत्रबाग”, “हादगाबाग”, “शेवगाबाग” व गावठाणातून वाडी-वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या फळझाडे परिसरात लागवड करण्यात आलेल्या १०० हून अधिक आयुर्वेदिक औषधी व निसर्गोपयोगी वनस्पतींची माहिती, वैशिष्टे, गुणधर्म, उपयुक्तता व महत्व यांची माहिती संकलित करून त्या-त्या झाडावर टॅग करता येईल अशी माहिती पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्याचे काम रासेयो स्वयंसेवकांनी या कालावधीत केलेले आहे. त्यामुळे जो कोणी व्यक्ती या परिसरात भेट देईल त्याला या प्रत्येक झाडांचे औषधी गुणधर्म, उपयुक्तता ई. ची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये व्याख्यानमाला व सदिच्छा भेटीच्या माध्यमातून रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत फुलसुंदर, मंचर येथील आण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. संजय पोकळे, महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शशिकांत घुंबरे, तसेच विद्युत अभियांत्रिकीचे प्रा. तुषार वाघमारे या मान्यवरांनी शिबिरार्थी स्वयंसेवकांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.
सायंकाळच्या सत्रामध्ये रासेयो स्वयंसेवकांनी वादविवाद, गटचर्चा, भजन-भारुडे गायन, विविध क्रीडा स्पर्धा व बौद्धिक स्पर्धा ई.च्या माध्यमातून विचारांचे आदान-प्रदान केले. दि.०३/०२/२०२४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांचे मनोरंजन व प्रबोधन करण्यात आले.
शिबीर कालावधीत महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे, डॉ. अंबादास माने, डॉ. नितीन फुटाणे, डॉ. मिलिंद बोनगुलवार, डॉ. सुहास करमारे, प्रा. नागप्पा काराजनगी, प्रा. एस. आर. पाटील, डॉ. (श्रीमती) मनीषा खळदकर, डॉ. (श्रीमती) लता एखंडे, प्रा. (श्रीमती) हर्षिता राक्षे, प्रा. (श्रीमती) प्राजक्ता पिंपळकर, प्रा. (श्रीमती) सायली कुलकर्णी या प्राध्यापकांनी, याशिवाय आंबेगाव तालुक्यातील जेष्ठ पत्रकार श्री. डी. के. वळसे-पाटील व त्यांचे सहकारी तसेच GMRT, खोडद येथील तांत्रिक सहाय्यक कुमार भोंडे व त्यांचे सहकारी यांनी शिबिरास सदिच्छा भेट व मार्गदर्शन याद्वारे शिबिरार्थी स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी गावाला असलेली वृक्षारोपणाची आवड पाहता मौजे नागापूर ग्रामपंचायत व श्री क्षेत्र थापलिंग देवस्थान ट्रस्ट यांना ११ आंब्याची रोपटी भेट स्वरुपात दिली.
शिबिराचे संपूर्ण नियोजन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
शिबीर कालावधीत श्री क्षेत्र थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. देवदत्तजी निकम, गावचे लोकनियुक्त सरपंच श्री. गणेश यादव, उपसरपंच श्री. सुनील शिंदे, माजी उपसरपंच भरत म्हस्के, श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा आण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. मधुकर वाघ सर, श्री नागेश्वर मंदीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रामचंद्र म्हस्के, श्री नागेश्वर दुध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन पवार, श्री क्षेत्र थापलिंग विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री. दौलत भोर, श्री क्षेत्र थापलिंग देवस्थान ट्रस्टचे सचिव श्री. डी. एन. पवार, श्री क्षेत्र थापलिंग देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. गणेश म्हस्के, श्री क्षेत्र थापलिंग देवस्थान ट्रस्टचे विश्वस्थ डॉ. संजय भोर व श्री. नवनाथ पोखरकर, तसेच श्री क्षेत्र थापलिंग देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक श्री. संदीप पोह्कर व त्यांचे सहकारी श्री. वसंत गावडे आणि समस्त ग्रामस्थांचे शिबिरार्थी स्वयंसेवकांना विशेष सहकार्य व प्रोत्साहन लाभले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: